॥ ॐ ॥
नाही जन्म नाही नाम।
नाही कुणी माता पिता।
प्रगटला अद्भुतसा।
ब्रह्मांडाचा हाच पिता॥१॥
नाही कुणी गुरुवर।
स्वये हाच सूत्रधार।
नवनाथी आदिनाथ।
अनाथांचा जगन्नाथ॥२॥
नरदेही नरसिंह।
प्रगटला तरुपोटी।
नास्तिकाच्या कश्यपूला।
आस्तिकाची देण्यागती॥३॥
कधी चाले पाण्यावरी।
कधी धावे अधान्तरी।
यमा वाटे ज्याची भीती।
योगेश्वर हाच यती॥४॥
कधी जाई हिमाचली।
कधी गिरी अरवली।
भक्तासाठी धावून जाई।
अक्कलकोटी कैवारी॥५॥
अगाध हे चरित्र त्याचे।
वर्णावया कोण सांगे।
शरणागत भावे जो भजे।
संकट त्याचे पळे लांबो॥६॥
जय जय स्वामी समर्थ।
जय जय स्वामी समर्थ॥
