शिवस्तुती

॥ ॐ ॥ 

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥

रवीन्दुदानावल पूर्ण भाळी ।
स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥

जटा विभूती उटी चंदनाची ।
कपालमाला प्रीत गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥

वैराग्ययोगी शिव शूलपाणी ।
सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥४॥

उदार मेरू पति शैलजेचा ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी तो गजचर्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥५॥

ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ ।
भुजंगमाला धरी सोमकांत ।
गंगा शिरी दोषमहाविदारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥६॥

कर्पूरगौरी गिरीजा विराजे ।
हळाहळें कंठ निळाच साजे ।
दारिद्र्यदुःख स्मरणें निवारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥७॥

स्मशानक्रीडा करिता सुखावे ।
तो देवचूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥८॥

भूतादिनाथ अरि अंतकाचा ।
तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥९॥

नंदी हराचा हर नंदिकेश ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१०॥

भयानक भीम विक्राळ नग्न ।
लीलाविनोदें करी काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्षमारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥११॥

इच्छा हराची जग हे विशाल ।
पाळी रची तो हरि ब्रह्मगोळ ।
उमापती भैरव विघ्नहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१२॥

भागीरथीतीर सदा पवित्र ।
जेथें असे तारकब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१३॥

प्रयागवेणी सकळा हराच्या ।
पदारविंदी वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१४॥

कीर्ती हराची स्तुती बोलवेना ।
कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१५॥

सर्वांतरी व्यापक जो नियंता ।
तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरूपधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१६॥

सदा तपस्वी असे कामधेनू ।
सदा सतेज शतकोटी भानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१७॥

कर्पूरगौर स्मरल्या विसावा ।
चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंती स्वहितसूचना विचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१८॥

विरामकाळी विकळे शरीर ।
उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनी चित्तहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१९॥

सुखावसानीं सकळें सुखाची ।
दुःखावसानी टळती जगाचीं ।
देहावसानी धरणी थरारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२०॥

अनाहतशब्द गगनी न माये ।
तिचेनि नादें भवशून्य होये ।
कथा निजांगे करुणा कुमारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२१॥

शांतिस्वलीला वदनीं विलासे ।
ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२२॥

पीतांबरें मंडित नाभी ज्याची ।
शोभा जडित वरी किंकिणींची ।
श्रीवेददत्त दुरितान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२३॥

जीवाशिवांची जडली समाधी ।
विटला प्रपंचीं तुटली उपाधी ।
शुद्धस्वरे गर्जती वेद चारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२४॥

निदान कुंभ भरला अभंग ।
पहा निजांगे शिवज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२५॥

मंदार बिल्वें बकुळें सुवासी ।
माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्वतारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२६॥

जाई जुई चंपक पुष्पजाती ।
शोभे गळा मालतीमाळ हातीं ।
प्रतापसूर्य शरचापधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२७॥

अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे ।
संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।
नेई सुपंथे भवपैलतारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२८॥

नागेशनामा सकळां जिव्हाळा ।
मना जप रे शिवयंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यानगुहाविहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२९॥

एकांती ये रे गुरुराजस्वामी ।
चैतन्यरूपी शिव सुखनामी ।
शिणलों दयाळा बहुसाळ भारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३०॥

शास्त्राभ्यास नको, व्रतें मख नका, तीव्रें तपें ती नको ।
काळाचें भय मानसीं धरू नको, दुष्टांस शंकू नका ।
ज्याचिया स्मरणें पतित तरती, तो शंभु सोडू नको ॥३१॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *